ओबीसी समाजासह विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्याची मागणी
- Get link
- X
- Other Apps
ओबीसी समाजासह विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्याची मागणी
धाराशिव दि.३ (प्रतिनिधी) - ओबीसी समाजासह विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या प्रलंबित असून त्या सोडवाव्यात अशी मागणी एका निवेदनाद्वारे ओबीसी, व्हीजेएनटी, एससी, एसटी, बहुजन परिषद यांच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे दि.३ ऑक्टोबर रोजी केली आहे.
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, कंत्राटीकरण व खाजगीकरणाचा शासन निर्णय रद्द करण्यात यावा, ६२ हजार शाळा शासनाकडेच ठेवाव्यात, खाजगी कंपन्याच्या ताब्यात देवू नयेत, मंडल आयोगाची १०० टक्के तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, बिहार राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात ओबीसींची जात निहाय जनगणना त्वरीत करण्यात यावी, ओबीसींना पदोन्नतीत आरक्षण देण्यात यावे, ओबीसींचा सरकारी नोकरीतील अनुशेष भरून काढण्यात यावा, नॉन क्रिमीलेअरची अट काढून टाकण्यात यावी किंवा त्यामध्ये दरवर्षी नियमीत मर्यादा वाढविण्यात यावी. तसेच महाज्योतीसह इतर मागास वर्गाच्या सर्व महामंडळांच्या आद्यादेश व संचालकांच्या नेमणूका तात्काळ करण्यात याव्यात, प्रत्येक जिल्हास्तरावर ओबीसींच्या विद्यार्थीनी- विद्यार्थ्यासाठी स्वतंत्र वसतीगृह सुरू करण्यात यावेत, ओबीसी विद्यार्थ्यांची सर्व फिस शासनाने भरावी, ओबीसी विद्यार्थ्याच्या शिष्यवृत्तीत महागाई दरानुसार वाढ करण्यात यावी, इ. ८ वीच्या आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील विद्यार्थ्यासाठी परिक्षेत सारथीप्रमाणे महाज्योतीनेही ओबीसी विद्यार्थ्यासाठी शिष्यवृत्ती चालू करावी. तसेच ओबीसी समाजाच्या २७ टक्के आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवावा, रमाई घरकुल योजनेच्या लाभार्थ्याना ३ लाख ५ हजार रूपये अनुदान देण्यात यावे, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप वेळेवर देण्यात यावी, गायरान जमीन नावावर करण्यात यावी, शहरातील अतिक्रमणधारकांना न.प. ने. कबाले देवून जागा नावावर करण्यात यावी, ग्रामीण भागात मागासवर्गीय लोकांची संख्या वाढल्याने निवासाच्या जागेची कमतरता असल्यामुळे शासनाने विस्तार वाढीसाठी जागा मंजूर करण्यात यावे तर पहिली ते पदवीपर्यंत सर्व समाजाला शिक्षण मोफत करण्यात यावे, उमरगा येथील चौरूखे पाडेवारांना निजामकाळात दिलेली महार वतन जमीन जुना सर्व्हे नं. १९९ च २०० एकूण जमीन १८ एकरच्या ऐवजी शासनाने त्रिकोळी येथे सन १९६२ ला सर्व्हे नं. १४७/७ एकूण क्षेत्र १२० एकर जमीन ही भोगवाटा एक (०१) करून दिली. नंतर वर्ग- दोन (०२) मध्ये करण्यात आलेली आहे. ती पुन्हा वर्ग १ मध्ये करण्यात यावी. यामध्ये असलेल्या १५ कुटुंबांना लाभ देण्यात यावा तसेच पाटील वतन, देशमुख वतन, महाजन वतन, कुलकर्णी वतन, पवार वतन, देशपांडे वतन या वतनाप्रमाणेच महार वतन ही वर्ग १ करण्यात यावे, आदी मागण्या केल्या आहेत. यावेळी धनंजय शिंगाडे, रवि कोरे, लक्ष्मण माने, शिवानंद कथले, तानाजी माळी, पांडुरंग कुंभार, मौलाना अलीम, बाबा मुजावर, इर्शाद कुरेशी, अहेमद मुजावर, फेरोज पल्ला, कृष्णा भोसले, पांडुरंग लोकरे, अभिजीत देडे आदी उपस्थित होते.
- Get link
- X
- Other Apps