महाराष्ट्रातील जनतेच्या कर्जमुक्तीसाठी जनता सरकार मोर्चाचे मोठे पाऊल - दुधाळ
महाराष्ट्रातील जनतेच्या कर्जमुक्तीसाठी जनता सरकार मोर्चाचे मोठे पाऊल - दुधाळ
धाराशिव दि.१८ (प्रतिनिधी) - जनता सरकार मोर्चाच्यावतीने कर्जमुक्त महाराष्ट्र अभियानांतर्गत धाराशिव, सोलापूर व लातूर जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर व व्यापाऱ्यांसाठी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वसामान्य जनतेला त्यांच्या हक्काची जाणीव करून देण्यासाठी ही व्याख्यानमाला आहे. ज्यांचे घर, शेती व वाहनावर कर्ज आहे. ते भरण्यासाठी बँका त्रास देत असतील अशा व्यक्तींचे व्याख्यान दरम्यान अर्ज भरून घेतले जाणार असून याबाबत त्यांना लगेच सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी, शेतमजूर व व्यापारी यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन जनता सरकार मोर्चाचे नवनाथ दुधाळ यांनी केले आहे.
या व्याख्यानमाले अंतर्गत दि.१८ ऑक्टोबर रोजी पंढरपूर तालुक्यातील रोपळे, अक्कलकोट येथे व्याख्यान पार पडले. तर दि.१९ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते १० या वेळेत धाराशिव तालुक्यातील तेर येथे व दुपारी २ ते ५ या वेळेत लातूर जिल्ह्यातील मुरुड येथे सायंकाळी ७ वाजता येडशी येथे व्याख्यान होणार आहे. तसेच दि.२० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता कळंब तालुक्यातील रत्नापूर येथे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
या व्याख्यानमालेत हरियाणा येथील डॉ. देवेंद्र बल्हारा, सुनील शर्मा, संजीव शर्मा, चाँद सिंग, नरेंद्र कुमार, नवनाथ दुधाळ व त्यांचे सहकारी कर्जमुक्तीसह विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये न्यू वर्ल्ड ऑर्डर, रुपयांचा इतिहास तसेच घर, शेती, वाहनांवरील कर्जामुळे शेतकरी, शेतमजूर किंवा व्यापाऱ्यांनी घाबरून जाऊ नये, आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये, कितीही कर्ज असले तरी जेएसएम वैध पैसे भरून तुम्हाला कर्जमुक्त करील याबाबत प्रबोधन करण्यात येणार आहे. तसेच ज्यांचे घर, वाहन किंवा जमिनीवर कर्ज आहे, त्यांनी जनता सरकार मोर्चाकडे अर्ज भरून द्यावेत. त्याना तात्काळ कर्जमुक्तीबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येईल. त्यामुळे या व्याख्यानाला संबंधित गावांसह परिसरातील शेतकरी, शेतमजूर, व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन दुधाळ यांनी केले आहे.