कृषी विभागास तुती लागवड कार्यक्रम राबविण्यासाठी शासनाची मंजुरी
कृषी विभागास तुती लागवड कार्यक्रम राबविण्यासाठी शासनाची मंजुरी
धाराशिव दि.२० (प्रतिनिधी) - महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सन २९२३-२४ साठी कृषी विभागास तुती लागवड कार्यक्रम राबविण्यासाठी शासनाकडून मंजुरी मिळाली आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत महासंचालक, मनरेगा मिशन व जिल्हाधिकारी यांच्या दि.११ सप्टेंबर रोजी झालेल्या आढावा बैठकीतील सुचनेनुसार कृषी विभागास तुती लागवडीसाठी अधिकार प्राप्त झाले आहेत. तूती लागवडीसाठी कमीत कमी १ एकर व जास्तीत जास्त ५ एकर प्रती लाभार्थी क्षेत्र मर्यादा आहे. लागवडी क्षेत्र कितीही असले तरी प्रत्येक लाभार्थ्यास ५० फुट लांबी व २२ फुट रुंदीचे किटक संगोपन गृहासाठीच अनुज्ञेय राहील. इच्छूक लाभार्थ्याने विहीत नमुन्यातील अर्ज (प्रपत्र अ- अर्जाचा नमूना व ब- संमती पत्र ) संबंधित कृषी सहाय्यक यांच्याकडे करावा. तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत फळबाग लागवड करण्यासाठी संबंधित कृषी सहाय्यक यांच्याकडे अर्ज करावेत. फळबाग लागवडीसाठी आंबा, काजू, चिकू, पेरू, डाळिंब, संत्रा, मोसंबी, कागदी लिंबू, नारळ, बोर, सिताफळ, आवळा, चिंच (विकसीत जाती) कवठ, जांभुळ, कोकम, फणस, अंजीर, सुपारी, बांबू, साग, जड्रोफा, गिरीपुष्प, कडीपत्ता, कडूलिंब) सिंधी, शेवगा, हदगा, पानपिंपरी, केळी (३ वर्ष), ड्रॅगनफ्रुट, ऍव्होकॅडो, द्राक्ष, चंदन आदी फळ पिकांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे सर्व इच्छूक शेतकऱ्यांनी संबंधित कृषी सहाय्यक, मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून जास्तीत जास्तीत जास्त अर्ज करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने कृषी यांनी केले आहे.