येडेश्वरी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी रुपये ५ कोटी ९४ लाख निधी मंजूर - आ. पाटील
येडेश्वरी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी रुपये ५ कोटी ९४ लाख निधी मंजूर - आ. पाटील
धाराशिव दि.१ (प्रतिनिधी) - आई येडेश्वरी देवी मंदिराकडे येरमाळा व मलकापूरकडून येणाऱ्या दोन्ही रस्त्यांच्या सुधारणेसाठी ५ कोटी ९४ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे. यामुळे या दोन्ही गावातील ग्रामस्थ व भाविकांची मोठी गैरसोय दूर होणार आहे.
आई येडेश्वरी च्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात. या मंदिराकडे दोन्ही राष्ट्रीय महामार्गाकडून जाणाऱ्या रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाल्याने या गावातील ग्रामस्थानसह भाविकांची मोठी गैरसोय होत होती. आई येडेश्वरीच्या भाविकांची संख्या मोठी असून या देवस्थानच्या विकास कामांसाठी आ.पाटील यांच्या प्रयत्नातून पर्यटन विभागाच्या माध्यमातून रुपये ५ कोटी रुपये मंजूर करून घेण्यात आले आहेत. या निधीमधून घ्यावयाच्या कामांबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे आयोजित बैठकीमध्ये अनेक ग्रामस्थ व पूजाऱ्यांनी या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आ. पाटील यांच्याकडे केली होती. तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विकास बारकुल, माजी जि. प. सदस्य मदन बारकुल, उपसरपंच गणेश बारकुल यांचा या कामासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू होता. त्यामुळे त्यांनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे आग्रही मागणी करून या रस्त्यासाठी निधी मंजूर करून घेतला आहे. पर्यटनाच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासासाठी मोठे प्रयत्न सुरू असून श्रीक्षेत्र तुळजापूरच्या विकासासाठी १ हजार ३२८ कोटी रुपयांच्या आराखड्यास मंत्रिमंडळाने मंजूरी दिली आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीची धाकटी बहीण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येडेश्वरी देवीच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आ. पाटील यांच्यासह भाविक, पुजारी व ग्रामस्थांनी ग्रामविकास मंत्री महाजन यांचे आभार व्यक्त केले आहेत.