पुढाकार महिलांचा बालविवाह मुक्त गाव अभियानचा दि. १ ते २५ नोव्हेंबर दरम्यान जनजागृती
- Get link
- X
- Other Apps
पुढाकार महिलांचा बालविवाह मुक्त गाव अभियानचा
तुळजापूर दि.४ (प्रतिनिधी) - वाढते बालविवाहाचे प्रमाण रोखण्यासाठी शासन विविध पातळीवर प्रयत्न करीत आहे. मात्र अनेकजण आपल्या मुला मुलींचा बालविवाह करण्याचा कार्यक्रम गुपचूपपणे उरकून टाकतात. त्यामुळे सर्व गावकऱ्यांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने अनदुर येथील हॅलो फाउंडेशनच्यावतीने तुळजापूर तालुक्यातील गावा गावांमध्ये बालविवाह गाव मुक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे.
सध्या खूप गंभीर परंतू सामाजिक दृष्टीकोनातून पाहिले तर सहजतेने घेतला जाणारा विषय म्हणजे बालविवाह होय. बालविवाह म्हणजे १८ वर्षाच्या आत मुलीचे व २१ वर्षाच्या आत मुलाचे विवाह होणे. हा बालविवाह म्हणजे मुला-मुलींवर झालेला अन्यायच आहे. त्याचे दुष्परिणाम हे अल्पवयीन मुलीवर तीव्र होतात. तर महिलांवर होणारी कौटुंबिक व सामाजिक हिंसाचार तसेच त्याची कारणे याचा अभ्यास केला तर आपल्याला दिसून येईल की, बालविवाह हा एक महिलांवर होणाऱ्या हिंसेचा कडेलोट आहे. बालविवाह हे एक दुष्टचक्र आहे. प्रचलित रूढी, परंपरांचे दडपण, मुलगी मोठी, सुशिक्षित, ज्ञानी होईल तर ती स्वतःचा जोडीदार स्वतः निवडण्याची भाषा करेल. परंतू कुटुंबाचे दैन्य, दारिद्र्य, सामाजिक असुरक्षितता यासह विविध कारणांमुळे लहान वयात मुलींचे लग्न उरकून टाकण्याचे विचार, प्रथा बळावत आहे.
स्त्रियांना मिळणाऱ्या दुय्यम वागणूकीचे रुपांतर हिंसेत होते. वर्तमान पत्रातून, टीव्ही, मोबाईलवर बलात्काराच्या, ऍसिड हल्ल्याचा, हुंडा बळीच्या, बाल-माता मृत्युच्या, आत्महत्येच्या बातम्या आपण बघतोच. आपल्या जिल्ह्यात देखील अशा घटना घडतात. हॅलो मेडिकल फाउंडेशन व स्विस एड संस्थेने २०१८ मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार विवाहित स्त्रियांवर होणाऱ्या कौटुंबिक हिंसेचे प्रमाण २५ टक्के, तर बाल विवाहाचे प्रमाण ५० टक्के व हुंडा देणे, घेण्याचे प्रमाण ७० टक्के आहे. २०१९-२० च्या सरकारने केलेल्या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रात २५.२ टक्के विवाहित स्त्रियांवर कौटुंबिक हिंसा झाली आहे. छर हिंसेमुळे महिलांना समानता, सुरक्षितता, सन्मान आणि मूलभूत स्वातंत्र्य नाकारले जाते.
बालविवाहाचे परिणाम बालविवाहाचे मुलींवर गंभीर परिणाम होतात. मुलींचे प्रगतीचे मार्ग खुंटतात, तिचे शिक्षण थांबते. लग्न झाल्यावर सहजपणे समाजात मिसळण्यावर बंधने येतात. वैवाहिक नात्यात तिचे स्थान दुय्यम राहते. एकूणच आयुष्यात सक्षमपणे उभे राहण्यात बालविवाह हा मोठा अडथळा ठरतो. लग्न झाल्यावर मुल जन्माला घालण्याचे दडपण असते. स्वतःच पोरपण संपलेले नसते अशा काळातच गर्भारपण येते. मुलींना स्वतःला लैंगिक संबंध व पुनोरोत्पादन, परिपक्व शरीरमन याबाबत फारसे ज्ञान नसते. आईचे शरीरमन परिपक्व होण्याच्या आत लादल्या गेलेल्या गर्भारपणात आईच्या आणि बाळाच्या जीवाला धोका असतो.
या सर्व स्थितीमुळे अनेक कुटूंबे संकटाच्या व समस्यांच्या खाईत लोटली जातात. या दुष्टचक्रातून बाहेर पडायचे असेल तर बालविवाह ही वाईट प्रथा बंद झाली पाहिजे. बालविवाह रोखले जावेत ही आपल्या सर्वांची सुज्ञ नागरिक म्हणून जबाबदारी आहे. त्यामुळे बालविवाह रोखण्यासाठी जाणीव जागृती समाजामध्ये निर्माण झाली पाहिजे. बालविवाहाच्या दुष्परिणामाबाबत जनजागृती झाली पाहिजे. केवळ कायद्याच्या धाकाने नव्हे तर बालविवाह ही प्रथा आपण आपल्याच कुटुंबावरती ओढवून घेत असलेली आपत्ती आहे. ही मानसिकता निर्माण होऊन, बालविवाह रूढी परंपरेला, मानसिकतेला आळा बसेल यासाठी आपण प्रयत्न करणे आवश्यक आहे. या प्रक्रियेतून तुळजापूर व लोहारा तालुक्यातील मानेवाडी, हगलूर, बसवंतवाडी, बोरनदीवाडी, तिर्थ खुर्द, चव्हाणवाडी, दिंडेगाव, वडगाव लाख, होनाळा, वडगाव देव, वाणेगाव, चिकुंद्रा, अलियाबाद, मानमोडी, वि.पांढरी, माळेगाव, मोघा खुर्द, उंडरगाव, फनेपूर, राजेगाव, करजगाव, रेबे चिंचोली, काटे चिंचोली, उदतपूर, मुर्षद्पूर, तोरंबा, सालेगाव,तावशी गड, कोंडजी गड या संस्थेच्या कार्यक्षेत्रातील गावात जनजागृती करण्यासाठी अभियान प्रभात फेरी/दिंडी, विविध गटांच्या बैठका विविध स्पर्धा, बालविवाह होऊ शकतात अशी कुटुंबे, युवक व युवती यांचे समुपदेशन, गावसभा, तज्ञांचे मार्गदर्शन, समाज प्रबोधन अशा विविध माध्यमातून गावपातळीवरील ६० पुरुष महिला कार्यकर्ते, प्रकल्प स्टाफ, लक्ष गट सदस्य यांच्या मार्फत बालविवाह विरोधी मानसिकता तयार करणे, जनजागृती करण्याचे नियोजन यांच्या संयुक्त विद्यमाने तुआले आहे. या सर्व प्रक्रियेत या गंभीर विषयाच्या संबंधित आयोजित केलेल्या बालविवाह मुक्त गाव अभियानात पुढाकार घेवून हे अभियान यशस्वी करावे असे आवाहन संस्थेच्या अध्यक्षा डॉ. शुभांगी अहंकारी, कार्यकारी विश्वस्त डॉ. क्रांती रायमाने, प्रकल्प समन्वयक बसवराज नरे, सहा. समन्वयक सतीश कदम, नागिणी सुरवसे, तुळजापूर वासंती मुळे यांनी केले आहे.
- Get link
- X
- Other Apps