गावागावातील बुद्ध विहारे ज्ञानाची केंद्रे बनावीत - भंदत्त महाविरो थेरो
- Get link
- X
- Other Apps
उमरगा दि.४ (प्रतिनिधी) - डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांनी काळाची पावले ओळखून चालायला शिकले पाहिजे. जयंती दिनी डीजेच्या तालात चालणारा धांगडधिंगाणे बंद करावेत. तसेच जयंतीनिमित्त होणारे नाचणे आपल्या नाश्याचे कारण होत असल्यामुळे जयंती मंडळात महिलांचा समावेश करून आर्थिक व्यवहार महिलांच्या हाती द्यावा. गावागावातील बुद्ध विहारे ज्ञानाची केंद्रे बनावीत असे प्रतिपादन पूज्य भंदत्त महाविरो थेरो यांनी केले.
उमरगा तालुक्यातील जकेकुर येथील आम्रपाली बुद्ध विहारात दि ४ नोव्हेंबर रोजी वर्षावास समारोप समारंभाच्या समारोपीय कार्यक्रमात उपस्थित उपसकांना संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी भंते पय्यानंद महाथेरो, भंते धम्मसार, भंते सुमेध नागसेन, भंते सुमंगल, सरपंच अनिल बिराजदार, जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष कैलास शिंदे, समाज कल्याणचे माजी सभापती हरिष डावरे, प्रदेश काँग्रेसचे सचिव दिलीप भालेराव, फुलचंद गायकवाड, डी.टी. कांबळे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना महाविरो म्हणाले की, तथागत भगवान बुद्धांच्या धम्मात त्यागाला अनन्य साधारण महत्व आहे. जगातील सर्वात श्रीमंत राजा सम्राट अशोकाने सर्व संपत्ती संघाला दान दिली व ८४ हजार स्तूप बनविले. तर आपला लाडका मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना धम्म प्रचार प्रसारासाठी दान दिले हा केवढा त्याग आहे याचे सर्वांनी स्मरण ठेवावे असे त्यांनी सांगितले. तसेच नम्रता हा सधम्माचा दागिना असून शील, समाधी व प्रज्ञा प्राप्त करण्यासाठी आपल्यातील द्वेष, मत्सर, अहंकार व लोभाचा नायनाट करा. तर आपले चित्त शांत ठेवण्यासाठी अष्ट शिलाचे आचरण करा. आपल्या अंतःकरणातील श्रद्धा विकसित करून धम्माच्या बीजांचे रोपण करावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी उपासक उपासिकांना धम्मदेसना देतांना भंते पय्यांनंद म्हणाले की, डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला महान धम्म विज्ञाननिष्ठ असून विज्ञानाच्या कसोटीवर त्याची पारख करा. धम्म प्रत्यक्ष आचरणात आणून बाबांच्या धम्मक्रांतीचे बीजारोपण करा. मनाला सुसंस्कृत करण्याची शिकवण धम्मात असून आपले जीवन शुद्ध निष्कलंक आणि चारित्र्य संपन्न बनविण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी केले. यावेळी गावातील मुख्य रस्त्यांनी भिक्षु संघाची मिरवणूक काढण्यात आली. तर भंतेच्या स्वागतासाठी सर्वत्र रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. तसेच सकाळच्या सत्रात भंतेजींच्या हस्ते धम्मध्वज फडकवण्यात आला. रात्री दीपक लांडगे व संच यांचा भीम - बुद्ध गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पवन कांबळे, व्यंकट सोनकांबळे, नवनाथ कांबळे, संतोष कांबळे, तानाजी सोनकांबळे, संजय सोनकांबळे, अमोल कांबळे, भास्कर कांबळे, प्रेम कांबळे, नेताजी कांबळे, विश्वास सोनकांबळे, विनायक कांबळे, वैजिनाथ कांबळे आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी तालुक्यातील औराद, कदेर, दाळिंब, येणेगुर, कसगी, माडज, कराळी, कोरेगाव, मुरूम आदी परिसरातील बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- Get link
- X
- Other Apps