जिल्ह्यातील उर्वरित तालुके देखील दुष्काळग्रस्त जाहीर करा - डॉ. पाटील
जिल्ह्यातील उर्वरित तालुके देखील दुष्काळग्रस्त जाहीर करा - डॉ. पाटील
धाराशिव दि.४ (प्रतिनिधी) - महाराष्ट्र शासनाने नुकतेच जिल्ह्यातील धाराशिव, वाशी व लोहारा हे ३ तालुके दुष्काळग्रस्त जाहीर केले आहेत. तर उर्वरित ५ तालुक्यात देखील अशीच परिस्थिती असल्यामुळे ते तालुके देखील दुष्काळग्रस्त जाहीर करावेत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे एका ई-मेलद्वारे दि.४ नोव्हेंबर रोजी केली आहे.
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, जिल्ह्यातील भूम, परंडा, कळंब, तुळजापूर व उमरगा या ५ तालुक्यांमध्ये देखील परिस्थिती गंभीर असून पाणी व चारा टंचाई जाणवत आहे. शासनाने दुष्काळ जाहीर न केल्यास या तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता आहे. तसेच जनावरांना देखील पिण्याचे पाणी व चारा या समस्या देखील भेडसावू शकतात. या तालुक्यात परिस्थिती गंभीर होऊ शकते. त्यामुळे हे ५ तालुके देखील तात्काळ दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावेत अशी मागणी केली आहे.