जिल्ह्यातील ४ हजार ७१६ विद्यार्थी स्कॉलरशिप परीक्षेमध्ये उत्तीर्ण जिप शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढणार
- Get link
- X
- Other Apps
जिल्ह्यातील ४ हजार ७१६ विद्यार्थी स्कॉलरशिप परीक्षेमध्ये उत्तीर्ण
जिप शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढणार
धाराशिव दि.७ (प्रतिनिधी) - विविध स्पर्धा परीक्षेमध्ये सक्षमपणे जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी उतरावेत. त्यांनी आपला व शाळेचा लौकिक करावा. या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या माध्यमातून खास ५ वी व ८ वीच्या विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप परीक्षा घेण्यात आली. यामध्ये ४ हजार ७१६ विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण होऊन आपली चुणूक दाखविली आहे. पहिल्याच प्रयत्नात विद्यार्थ्यांनी यशाला गवसणी घालीत यश संपादन केले आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना शैक्षणिक दृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत व येणार आहेत. तसेच कोणत्याही परिस्थितीत या विद्यार्थ्यांमधूनच कमीत कमी ३ हजार विद्यार्थी राज्यस्तरीय परिक्षेसाठी सक्षम करणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी दिली.
स्कॉलरशिप परीक्षेमध्ये खासगी शाळेच्या विद्यार्थ्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण जास्त आहे. त्या तुलनेत जिल्हा परिषदेचे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमध्ये कमी व नगण्य आहेत. ही उणीव दूर करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळेत जे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांना देखील या परीक्षेचे ज्ञान व्हावे व स्पर्धा परीक्षेमध्ये उतरून यश मिळवता यावे यासाठी शैक्षणिकदृष्ट्या सक्षम बनविण्याचे प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. तर त्याचाच एक भाग म्हणून इयत्ता ५ वी व ८ वीच्या विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी ५ वी मधील १० हजार २६४ तर ८ वी मधील ३ हजार ८९० अशा एकूण १४ हजार १५४ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी आपले अर्ज भरले होते. त्यापैकी ५ वीच्या ८ हजार ९९३ तर ८ वीच्या ३ हजार २४५ अशा एकूण १२ हजार २३८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये ५ वीचे ८७.६२ टक्के तर ८ वीचे ८३.४२ टक्के प्रमाण आहे. परीक्षा दिलेल्या ५ वीचे ३ हजार ९२१ यापैकी ७०८ विशेष प्राविण्य तर ८ वीचे ७९५ यापैकी १२ विद्यार्थी विशेष प्राविण्याने उत्तीर्ण झाले असून उत्तीर्ण होण्यामध्ये ५ वीचे ४३.५८ टक्के तर ८ वीचे २४.४९ टक्के प्रमाण नक्कीच वाखणण्याजोगे आहे. तसेच या विद्यार्थ्यांच्या ४ परीक्षा घेण्यात येणार असून प्रत्येक महिन्याला म्हणजे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी व फेब्रुवारीमध्ये घेण्यात येणार असल्याचे गुप्ता यांनी सांगितले.
- Get link
- X
- Other Apps