महायुतीच्या कामामुळे खासदार, आमदारांची पोटदुखी - काळे
महायुतीच्या कामामुळे खासदार, आमदारांची पोटदुखी - काळे
धाराशिव दि.९ (प्रतिनिधी) - राज्यासह केंद्रात महायुती सरकारचे काम चांगल्या प्रकारे चालू आहे. जिल्ह्यात इतिहासात पहिल्यांदा २५ टक्के अग्रीमची शेतकºयांना रक्कम मिळत आहे. तर ग्रामपंचायत निवडणूकीतही महायुतीला ७० टक्के यश मिळाले आहे. मात्र खा ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आ. कैलास पाटील यांची या कामामुळे पोटदुखी सुरु झाली आहे. त्यामुळेच त्यांनी पत्रकार परिषद घेवून सरकारवर आरोप सुरु केले असल्याचा पलटवार भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी दि.८ नोव्हेंबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत केला.
भाजप भवन येथे आयोजि पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, भाजपा किसाने मोर्चाचे रामदास कोळगे, ऍड. खंडेराव चौरे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना
काळे म्हणाले की, राज्यात व केंद्रातील सरकारवर आज सर्वसामान्य नागरिक समाधानी आहे. धाराशिव जिल्ह्यातही पिक विम्यासाठी आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह भाजपाच्या टिमने प्रयत्न केले आहेत. पीक विम्यासाठी आम्ही न्यायालयीन लढा लढला. त्यासाठी अनेक बैठका घेतल्या. पाठपुरावा केला. मात्र जिल्ह्यातील खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आ. कैलास पाटील यांनी उध्दव ठाकरे यांचे सरकार असताना एक साधी बैठकही घेवून शेतकºयांसाठी आत्मीयता दाखवली नाही. मात्र आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम पीक विमा इतिहासात पहिल्यांदा मिळत आहे. तसेच सरकारच्या विविध कामांमुळे आज राज्यासह धाराशिव जिल्ह्यातही ग्रामपंचायत निवडणूकीत महायुती चांगले यश मिळत आहे. यामुळे त्यांची पोटदुखी वाढली असल्याची जहरी टीका त्यांनी केली.