नव्या पुलास पडलेल्या भगदाडास वरुन सिमेंट तर खालून प्लायवूडची मलमपट्टी ! धाराशिव

नव्या पुलास पडलेल्या भगदाडास वरुन सिमेंट तर खालून प्लायवूडची मलमपट्टी !

अपघात होण्याचा धोका अटळ
उमरगा दि.६ (प्रतिनीधी) - राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ वर चौपदरीकरणात बांधण्यात आलेल्या बलसुर फाट्या जवळील नव्या पुलाला भगदाड पडल्याने सिमेंट लावून बुजविण्याचा प्रयत्न झाला आहे. विशेष म्हणजे पुलाच्या खालच्या बाजूस प्लायऊड मारून जुजबी मलमपट्टी केली आहे. त्यामुळे रस्त्यावरून वाहतुक करणाऱ्या वाहन चालकात भीतीचे वातावरण निर्मान झाले आहे. 

उमरगा तालुक्यातील बलसुर फाट्या जवळील सोलापूरकडे जाणाऱ्या नव्या पुलावर ५ बाय २  मीटरचे भगदाड पडल्यानंतर रात्रीतून तातडीने सिमेंट काँक्रीटने मलमपट्टी करूण त्यावर संबंधित यंत्रणेचे वाहन २ दिवस उभे केले होते. त्यामुळे हे भगदाड इतरांना दिसू नये. विशेष म्हणजे पुलाच्या खालून  पुलाला रस्त्यावर प्लायवूड मारल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण असून २ दिवसानंतर दि.६ सकाळी या भगदाडच्या ठिकाणी उभे असलेले वाहन हटविण्यात आले आहे.
जिल्ह्याच्या हद्दीतून उमरगा -सोलापूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गाच्या रस्ता चौपदरीकरणाचे कर्नाटक सीमेपर्यंतचे काम कासवगतीने व निकृष्ट दर्जाचे आजही सुरूच आहे. कामाचा दर्जा निकृष्ट असल्यामुळे झालेल्या रस्त्याच्या कामावर पुढचे काम सुरू असतानाच मागील झालेल्या रस्त्यास मोठ-मोठे खड्डे पडलेले आहेत. राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी नवीन पुलाचे बांधकाम झाले असून २ ठिकाणी तर या पूलाचा वापर करण्यापूर्वी हे पुल खचून बांधकामासाठी वापरलेल्या लोखंडी सळई उखडल्याने वाहनधारकांना येथून ये-जा करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
या मार्गावर रात्रंदिवस धावत असलेल्या वाहनांना रस्त्यावरील खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यामुळे खड्डे चुकविताना वाहन पलटी होणे, समोरासमोर धडक बसणे, खड्ड्यात वाहन अडकून बंद पडणे आदी कारणाने वारंवार अपघात होत आहेत. त्यामुळे महामार्गावरील अवजड वाहतूक करणाऱ्या वाहनांसह अन्य प्रवाशांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
महत्वाचे म्हणजे डाळिंब गावा जवळील रस्त्याचे सुरू असलेले कामे निकृष्ट असल्याचे ग्रामस्थांच्या तक्रार आहेत. काळ्या मातीचा वापर, माती मिश्रित मुरमाचा वापर करून काम सुरू असल्याचे दिसून येते आहे.  डाळिंब गावात १० दिवसांपूर्वी केलेला डांबरीकरण रस्ता पूर्णतः खचून दबला गेला आहे हे विशेष. तालुक्यातुन जाणाऱ्या रस्त्याच्या कामावर गेल्या अनेक वर्षापासून वाढत्या तक्रारी आहेत. डाळिंब गावातील ग्रामस्थांनी काळ्या मातीचा वापर करून काम सुरू असतानाही हे काम अडविले होते. तरी‌ देखील वरिष्ठाकडून याकडे डोळे झाक होत आहे. काम जलद गतीने होण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन बैठका घेऊनही कसलीही सुधारणा होत नाही या मागचे गौड बंगाल लोकांना समजत नसल्याची चर्चा आहे. मागील ८ वर्षापासून महामार्गाच्या निकृष्ट संत गतीचे काम व ओव्हर ब्रिज अंडरपासच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने सातत्याने धरणे व रस्ता रोको आंदोलने करण्यात आली आहेत. तर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनाही याबाबत पत्राद्वारे, प्रत्यक्ष भेटून कल्पना देण्यात आलेली आहे. मात्र येथील महामार्ग शेजारील गावांसाठी अंडरपास व उड्डाणपुल बांधकामाची मंजुरी देण्यात आली नाही. मधल्या काळात लोकप्रतिनिधींनी टोल बंद आंदोलन केल्याने महामार्ग प्राधिकरण व गुत्तेदाराने त्वरित काम संपवण्याचे आश्वासन दिले व काम चालू केले. परंतू आजही महामार्गाचे काम अत्यंत संथ गतीने चालत असून निकृष्ट स्वरूपाचे केले जात आहे. या निकृष्ट महामार्गाने आज तागायत अनेकांचा बळी घेतला असून कित्येक कुटूंबे उध्वस्त केली आहेत. आजही निकृष्ट कामाचा धडका चालूच असून प्रवासी वाहनधारकांवर मृत्यूची टांगती तलवार लटकत आहे.

.....................................

राष्ट्रीय महामार्गावर निकृष्ट कामाबाबत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने यापूर्वी अनेकदा तीव्र आंदोलन करण्यात आले होते. मात्र कामाच्या दर्जाबाबत कसलीही सुधारणा झालेली नाही. लोकप्रतिनिधींनीही बैठक घेतलेली होती. गावातील सर्विस रोडवर अद्यापही काळ्या मातीचा वापर करून निकृष्ट काम होत आहे .गावात नवीन केलेले दहा दिवसांपूर्वीचे डांबरीकरण खचलेले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे उमरगा तालुकाध्यक्ष बाबा जाफरी यांनी दिली.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !