नळदुर्गसह १७ मंडळांना ७० कोटी मिळणार - आ. पाटील
- Get link
- X
- Other Apps
नळदुर्गसह १७ मंडळांना ७० कोटी मिळणार - आ. पाटील
धाराशिव दि.४ (प्रतिनिधी) - राज्यात सर्वप्रथम अग्रीम विमा वितरणास जिल्ह्यातील ४० महसूल मंडळांतील शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. तर नळदुर्गसह वगळलेल्या इतर १७ महसूल मंडळांतील शेतकऱ्यांना अग्रीम नुकसान भरपाईचे जवळपास ७० कोटी रुपये मिळणार आहेत. ही रक्कम दिवाळीपूर्वी मिळावी यासाठी ताकदीने प्रयत्न सुरू असल्याची माहिती आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील ४० महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यात १६१ कोटी ८० लाख रुपये दि.३ नोव्हेंबरपासून जमा होत आहेत. दिवाळीपूर्वी सणासाठी कधी नव्हे ती भरपाईची रक्कम मिळाल्याने शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त होत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. तसेच पावसातील खंडामुळे जिल्ह्यातील सर्वच मंडळांमधील सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मात्र ४० महसूल मंडळामध्ये पावसाचा २१ दिवसांपेक्षा अधिकच खंड पडल्यामुळे पहिल्या टप्प्यात जिल्हाधिकाऱ्यांनी अग्रीमबाबत अधिसूचना काढली होती. तर इतर मंडळातील पीक परिस्थिती विचारात घेवून उर्वरित १७ महसूल मंडळाची दुसऱ्या टप्प्यात अधिसूचना काढली होती. त्यामुळे पहिल्या टप्प्यात जाहीर मंडळांतील अग्रीम रकमेचे वितरण सुरू असून दुसऱ्या टप्प्यातील १७ महसूल मंडळांना देखील दिवाळीपूर्वीच अग्रीम देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग, कळंब तालुक्यातील कळंब, ईटकुर, मोहा, गोविंदपूर, भूम तालुक्यातील भूम, वालवड, अंभी, पाथरुड, माणकेश्वर, आष्टा, परंडा तालुक्यातील आसू, जवळा, पाचपिंपळा, वाशी तालुक्यातील वाशी, तेरखेडा व उमरगा तालुक्यातील नारंगवाडी या मंडळांचा समावेश आहे. महायुती सरकार शेतकाऱ्यांप्रती अतिशय संवेदनशील असून विमा कंपन्यांना त्या अनुषंगाने सूचना दिल्या असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
- Get link
- X
- Other Apps