कृष्णा मराठवाडा पाईप लाईनचे बोगस काम गावकऱ्यांनी रोखले इस्टीमेटप्रमाणे काम करण्याची मागणी

कृष्णा मराठवाडा पाईप लाईनचे बोगस काम गावकऱ्यांनी रोखले

 इस्टीमेटप्रमाणे काम करण्याची मागणी

धाराशिव दि.५ (प्रतिनिधी) - तुळजापूर तालुक्यातील पांगरदरवाडी शिवारात कृष्णा मराठवाडा बांधकाम विभाग अंतर्गत कालवा सिंचन योजनेचे काम सुरु आहे. मात्र हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्यामुळे येथील गावकऱ्यांनी काम बंद करुन ठेकेदारासह बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना धारेवर धरले. 

उजनी धरणाचे मराठवाड्याच्या हक्काचे २१ टि.एम.सी पाणी आणण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. २०२४ पर्यंत मराठवाड्याच्या हक्काचे पाणी मिळणार असल्याचे ६ महिन्यापूर्वी खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पांगरदरवाडीत येऊन सांगितले होते. कृष्णा मराठवाडा बांधकाम विभागाअंतर्गत सुरु असलेल्या सिंचन तलाव व पंप हाऊसचे काम पाहण्यासाठी ते पांगरदरवाडीच्या दौऱ्यावर आले होते. एकीकडे लवकरच पाणी मिळणार असल्यामुळे शेतकरी आनंदीत आहेत. तर दुसरीकडे ठेकेदाराने निकृष्ट बोगस कामाचा सपाटा लावला आहे. पांगरदरवाडी पंपगृहातुन सिंचन कालव्यात पाणी सोडण्यासाठी भूमिगत पाईप लाईनचे काम सुरु असून पाईप लाईन मुरुम टाकून बुजवणे गरजेचे असताना ठेकेदार मोठ-मोठे दगडे टाकून पाईप लाईन बुजवत असून भविष्यात हे धोकादायक आहे. या कामाकडे संबंधित कृष्णा मराठवाडा बांधकाम विभाग टप्पा क्रमांक ४ च्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदारावर तत्काळ कारवाई करावी व अंदाजपत्रकानुसार काम करावे अशी मागणी उपसरपंच सोमनाथ शिंदे, गणेश गायकवाड, किशोर मते, महेश सावंत, सागर फंड, नागनाथ मारडकर, शिवाजी कदम आदी गावाकऱ्यांनी केली आहे.


..................


कामाच्या गुणवत्ते संदर्भात आम्ही ४ दिवसांपूर्वी संबंधित ठेकेदाराला सांगितले होते. मात्र त्याने कामात सुधारणा केली नाही. कॅनॉलच्या शेजारी पडलेल्या दगडांनी पाईप लाईन बुजवली जात आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदारावर व कामात दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी उपसरपंच सोमनाथ शिंदे यांनी केली आहे.


................


संबंधित कामात दगडाचा वापर झाला आहे. अंदाजपत्रक पाहून कारवाई केली जाईल असे आश्वासन कृष्णा मराठवाडा बांधकाम विभाग टप्पा क्रमांक ४ चे अभियंता रोहन पवार यांनी दिले.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !