उमरगा तालुक्यासह उर्वरित तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करावा - आ. चौगुले
- Get link
- X
- Other Apps
उमरगा तालुक्यासह उर्वरित तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करावा - आ. चौगुले
उमरगा दि.४ (प्रतिनिधी) - उमरगा तालुक्यासह जिल्ह्यातील उर्वरित तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करावा. तसेच नारंगवाडी मंडळातील शेतकऱ्यांना अग्रीमसाठी पात्र करावे अशी मागणी आ ज्ञानराज चौगुले यांनी एका पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन केली आहे.
दिलेल्या पत्रात असे नमूद करण्यात आले आहे की, यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यासह राज्यभरात अत्यंत कमी पर्जन्यमान झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने राज्यातील सुमारे ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला आहे. परंतू यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील ८ पैकी केवळ ३ तालुक्यांचा समावेश केला असून उमरगा, तुळजापूर, भूम, परंडा व कळंब हे ५ तालुके दुष्काळग्रस्त यादीतून वगळण्यात आले आहेत. वास्तविक संपूर्ण जिल्ह्यात वार्षिक सरासरीपेक्षा अत्यंत कमी प्रमाणात पाऊस झाला आहे. तसेच जिल्ह्यात पावसाचा अनेक दिवस खंड पडल्याने जमिनीतील पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात घट झाली. त्यामुळे पिकांवर त्याचा परिणाम होऊन पिकांचे नुकसान व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. तर सद्यस्थितीत उमरगा तालुक्यात एकाही तलावातील पाणी पातळीत वाढ झालेली नाही. तसेच आगामी काळातही पाऊस न झाल्यास संपूर्ण रब्बी हंगाम वाया जाऊन शेतकऱ्यांचे नुकसान होईल. तसेच उन्हाळ्यात नागरिकांना मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. तर उमरगा तालुक्यातील नारंगवाडी मंडळ काही तांत्रिक कारण दाखवून अग्रीमसाठी पात्र नसल्याचे विमा कंपनीने आदेश काढला होता. परंतू सदर तांत्रिक बाब दूर करून जिल्हाधिकाऱ्यांनी नारंगवाडी मंडळ पात्र असल्याचे आदेश पारित केला होता. असे असूनही संबंधित विमा कंपनीद्वारे चालढकलपणा केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या मंडळातील शेतकऱ्यांना प्रचंड आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. त्यामुळे नारंगवाडी मंडळातील शेतकऱ्यांना अग्रीमसाठी पात्र करावे अशी मागणी आ चौगुले यांनी केली आहे.
- Get link
- X
- Other Apps