डॉ. आंबेडकर साखर कारखान्याचा २० वा गळीत हंगाम शुभारंभ

डॉ. आंबेडकर साखर कारखान्याचा २० वा गळीत हंगाम शुभारंभ 

धाराशिव दि.५ (प्रतिनिधी) - तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम २०२३-२४ चा २० च्या ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ कारखान्याचे संचालक फत्तेसिंह देशमुख, शंकर सुरवसे व नामदेव पाटील यांच्या हस्ते प्रथमतः वजन काट्याचे पूजन व विधीवत गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून व गव्हाणचे पूजन करुन दि.४ नोव्हेंबर रोजी करण्यात आला.

कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष अरविंद गोरे म्हणाले की, ऊस शेती हेच शेतकऱ्यांचे प्रमुख उत्पन्नाचे साधन असून कमी पाण्यात व कमी खर्चात शेतीचे नियोजन करणे गरजेचे आहे. तसेच आपला परिसर आवर्षण प्रवण असल्यामुळे गेल्या ५० वर्षापासून टंचाई, कमतरता, दुष्काळ तसेच ऊस नाही म्हणून कारखाना बंद ठेवायचा तर कधी जास्त ऊस झाला म्हणून पावसाळ्यातही कारखाना चालु ठेवून ऊस संपायचा नाही हे चक्र चालुच आहे. तर महाराष्ट्राच्या तुलनेत आपल्या जिल्ह्यात छोटे मोठे गुळपेटी कारखान्यांचे पेव फुटले आहेत. अशातच कारखान्यांनी वाढविलेली गाळप क्षमता यामुळे कितीही ऊस जास्त झाला तरी कारखान्याचे गाळप १०० ते १२० दिवसांच्या पुढे जाणार नाही. त्यामुळे यापुढे महाराष्ट्रात ऊस मोठ्या प्रमाणावर झाला अशी परिस्थिती कधीच येणार नाही. तर कारखाना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी कारखान्याचे गाळप किमान १६० दिवस चालणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आपल्या भागातील ऊसाला नोव्हेंबर डिसेंबरमध्ये जास्तीची रिकव्हरी मिळत नाही. उसाची जास्त रिकव्हरी मिळण्यासाठी ऊस उशिरा गाळप करणे योग्य आहे. त्यामुळे उसाला जास्तीचा भाव देणे शक्य होते. परंतू सध्या शेतकरी ऊस दराचा विचार न करता कारखान्याने लवकर ऊस तोडून घेऊन जाणे अशी मानसिकता निर्माण झाली आहे. डॉ आंबेडकर कारखाना हे एक कुटूंब असून सगळ्यांच्या हिताच्यादृष्टीने निर्णय घेऊन त्यांना आजतागायत न्याय देण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच सर्वांनी सामूहिक प्रयत्न करुन आजच्या स्पर्धेत साखर कारखाना जिवंत ठेवणे गरजेचे असून दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे कमी पाण्यात ऊस पीक जोपासण्याचे शेतकऱ्यांनी नियोजन करणे गरजेचे आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना कारखान्यामार्फत खोडवा व्यवस्थापन कार्यक्रमाच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले. कारखान्याला सुरुवातीपासून पाण्याचा प्रश्न असताना देखील वेगवेगळे मार्ग काढत प्रतिकुल परिस्थितीवर मात करत आलेलो आहोत. त्याचाच एक भाग म्हणून यावर्षी चालू हंगामात झिरो वॉटर इनटेक व झिरो डिस्चार्ज हा प्रयोग राबविण्यात येणार असल्यामुळे हंगामात बाहेरील पाणी घेण्याची आवश्यकता नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच कारखाना प्रोसेसमधून निघणारे पाणी देखील बाहेर जाणार नसल्याचे सांगत ते म्हणाले की, या कारखान्याला लायसन्स मिळविण्यापासून ते आजपर्यंत बऱ्याच जेष्ठ मंडळी व सहकाऱ्यांचे सहकार्य लाभले त्यात कै. शिवाजीराव (दादा) साळुंके यांचे आवर्जुन स्मरण केले. तसेच कारखान्याबद्दलची आत्मीयता व दृढ भावनेतून कारखान्याचे जेष्ट व तज्ञ संचालक प्रतापराव देशमुख हे आजारी असताना देखील दवाखान्यातून डिस्चार्ज घेवून कार्यक्रमास आवर्जुन उपस्थितीत राहीले याचाही उल्लेख केला. त्यानंतर कारखान्याचे सभासद, सर्व ऊस उत्पादक शेतकरी, हितचिंतक, ऊस तोड, वाहतुक यंत्रणा, कर्मचारी व कामगार यांच्या सहकार्यातून येणारा गाळप हंगाम यशस्वी करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये संचालक ऍड. निलेश बारखडे पाटील यांनी कारखाना स्थापनेपासून आजपर्यंतची कारखान्याची वाटचाल, कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष अरविंद गोरे यांच्या पारदर्शक व्यवहारातून कारखान्याची निर्माण झालेली विश्वासार्हता व याच जोरावर कारखान्याची पुढील होणारी वाटचाल याचा सविस्तर आढावा मांडला. सूत्रसंचालन संचालक आयुबखॉ पठाण यांनी तर कारखान्याचे संचालक ऍड. चित्राव गोरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !