नॅचरल शुगरच्या गंधक व रसायनमुक्त साखर निर्मितीचा शुभारंभ पहिल्या गंधक विरहीत’ साखर पोत्याचे पूजन
नॅचरल शुगरच्या गंधक व रसायनमुक्त साखर निर्मितीचा शुभारंभ
पहिल्या गंधक विरहीत’ साखर पोत्याचे पूजन
रांजणी दि.६ (प्रतिनिधी) - कळंब तालुक्यातील रांजणी येथील नॅचरल शुगर कारखान्यामध्ये गंधक व रसायनमुक्त साखर उत्पादन चालु गाळप हंगामात सुरू झाले आहे. पहिल्या-वहिल्या हंगामातील गंधक व रसायनमुक्त उत्पादीत पहिल्या साखर पोत्याचे पूजन कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष कृषिरत्न बी.बी. ठोंबरे यांच्या हस्ते दि.४ नोव्हेंबर रोजी करण्यात आले.
हवामान बदलातील पर्यावरण असंतुलना बरोबरच विषारी रसायन युक्त अन्नधान्यामुळे मानवी जीवन अत्यंत धोक्यात आलेले आहे. पर्यावरण संतुलीत विकास व विषमुक्त अन्न’ हे धेय्य उराशी बाळगून २२ वर्षांपूर्वी मुहूर्तमेढ रोवलेल्या नॅचरल परिवाराने पर्यावरण संतुलीत विकास तर यापूर्वीच साधलेला आहे. मात्र विषमुक्त अन्न ही संकल्पना मूर्त स्वरूपात आणण्यात नॅचरल परिवारास आता १०० टक्के यश मिळालेले आहे.
कळंब तालुक्यातील रांजणी येथील नॅचरल शुगर कारखान्यामध्ये चालु गळीत हंगामापासून १०० टक्के गंधक व इतर रसायन मुक्त (सल्फर व केमिकल फ्री) साखर निर्मितीस सुरूवात झालेली आहे. साखर निर्मिती प्रक्रियेमध्ये गंधकासह अनेक प्रकारच्या केमिकल्स्चा वापर केला जातो. त्यामुळे त्याचे शरीराला अपायकारक असे अंश कांही प्रमाणात साखरेमध्ये मिसळतात. तर काही प्रमाणात साखर मनुष्याच्या आरोग्यास अपायकारक ठरू शकते. त्यामुळे पाश्चिमात्य देशांमध्ये गंधक व केमिकल विरहीत साखरेचेच उत्पादन व सेवन केले जाते. साखर हा मानवी आहारातील अत्यावश्यक घटक असून तो मानवी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील आहे. त्यादृष्टीने नॅचरल शुगरने गंधक व रसायनमुक्त साखर निर्मितीचे स्वप्न उराशी बाळगून प्रकल्पाची सुरूवात केली. आज महत्प्रयासा नंतर व अनेक संशोधना नंतर हे स्वप्न वास्तवात साकार झाले. चालु गळीत हंगाम २०२३-२४ पासून नॅचरल शुगरमध्ये साखर उत्पादन प्रक्रियेत गंधक व कोणत्याही घातक रसायनाचा वापर न करता ऑरगॅनिक एंझाईम्स्चा वापर करून व यंत्र सामुग्रीमध्ये अत्याधुनीक बदल करून १०० टक्के गंधक विरहीत साखर उत्पादनाची सुरूवात झाली आहे. त्यानुसार चालु हंगामासह यापुढे कायमस्वरूपी नॅचरल शुगर गंधक व रसायनमुक्त साखर निर्मितीमध्ये अग्रेसर राहील. त्यांनी वरील प्रमाणे गंधक व रसायनमुक्त साखर उत्पादनाचे उद्दीष्टपूर्ती बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच सर्व साखर व्यापारी व ग्राहकांना निवेदन केले की, यापुढे नॅचरल शुगरची गंधक व रसायन मुक्त साखरच आपल्या दैनंदीन वापरामध्ये वापरावी व आपले आरोग्य चांगले राहील हे पहावे असे आवाहन ठोंबरे यांनी केले.
साखर पोते पुजनास कारखान्याचे संचालक, प्रवर्तक, ऊस उत्पादक शेतकरी, कारखान्याचे जनरल मॅनेजर यु.डी.दिवेकर व कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.