संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
धाराशिव दि.२ (प्रतिनिधी) - जिल्ह्यातील तीन तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला असून उर्वरित पाच तालुके दुष्काळाच्या छायेत असताना देखील त्या तालुक्याला वगळण्यात आलेले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार जयंत पाटील यांच्याकडे केली होती. त्या मागणीच्या आधारे आमदार पाटील यांनी मुख्यमंत्र्याकडे केली आहे.
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, दि.३१ ऑक्टोबरच्या शासन निर्णयानुसार धाराशिव जिल्ह्यातील ३ तालुके दुष्काळी जाहीर केलेले आहेत. जिल्ह्यातील घटलेल्या पर्जन्यमानामुळे भूजल पातळी १.६ मीटरने मागील ५ वर्षाच्या सरासरीने घसरली आहे. जिल्ह्यातील तळ्यामधील जलसाठा १२ टक्के आहे. रब्बी पेरणी गतवर्षाच्या तुलनेत अर्ध्यावरच राहिली आहे. शासनाने धाराशिव जिल्ह्यातील ३ तालुके जरी ट्रिगर-२ लागू झाले असले तरी पीक उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. मराठवाडयात सर्वात जास्त पशुधन असलेला जिल्हा आहे. तथापि, जिल्ह्यामध्ये जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे. त्यामुळे जिल्ह्यामधील उर्वरित ५ तालुक्यासहित पीक व पाण्याची परिस्थिती पाहता संपूर्ण जिल्हा दुष्काळ जाहिर करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगांवकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे केली आहे. त्यामुळे त्यांच्या मागणीनुसार संपूर्ण धाराशिव जिल्ह्यामध्ये दुष्काळ घोषित करण्यासाठी उचित कार्यवाही व्हावी, अशी मागणी जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.