नगर परिषदेची जागा विक्री करणाऱ्याने दिली धमकी !
नगर परिषदेची जागा विक्री करणाऱ्याने दिली धमकी
धाराशिव दि. ११ (प्रतिनिधी) - नगर परिषदेने मोबदला देऊन खरेदी घेऊन आरक्षित केलेली जागा काहीजणांनी सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयातील एका कर्मचाऱ्याच्या संगणमताने ती विक्री केलेली आहे. या विरोधात तक्रार केल्यानंतर त्या कर्मचाऱ्याने शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करीन व तुझे आयुष्य बरबाद करीन अशी धमकी दिली आहे. त्यामुळे त्या कथित विक्री प्रकरणाची चौकशी करून संबंधितावर कारवाई करावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक) चे जिल्हाध्यक्ष राज धज यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे दि.११ जून रोजी केली आहे.
धाराशिव, नगर पालिकेने २००३ मध्ये सर्व्हे क्रमांक २०६/२ मधील जागा आरक्षित केली असून ती जागा पालिकेने मोबदला देऊन अधिग्रहित केली आहे. मात्र, काही व्यक्तींनी दुय्यम निबंधक कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने या क्षेत्रातील जमिनीची विक्री केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याबाबत त्यांनी यापूर्वीही तक्रार करून चौकशीची मागणी केली होती. त्यामुळे त्या श व्यवहारा संदर्भातील खरेदी खत आणि नंतरचे दस्तऐवज पाहता सर्व्हे क्रमांक २०६/२ मधील सुमारे ३० आर क्षेत्र हे नगर पालिकेच्या मालकीचे असल्याचे दिसून येते. याबाबत सह जिल्हा निबंधक कार्यालयाकडेही तक्रार करण्यात आली होती. मात्र, संबंधित कर्मचाऱ्यावर कोणतीही कारवाई झालेली नसल्याचा आरोप धज यांनी केला आहे. दि. धज १० जून रोजी सहजिल्हा निबंधक कार्यालयात धज गेले असता संबंधित कर्मचारी तेथे आला. चर्चा संपल्यानंतर कार्यालयाबाहेर आल्यावर त्याने “तू माझ्या नादाला लागू नकोस, सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करून तुझे आयुष्य उद्ध्वस्त करीन,” अशी धमकी दिली. त्यामुळे भविष्यात धज यांच्यावर हल्ला, शिवीगाळ किंवा खोटे गुन्हे दाखल झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित कर्मचारी व व्यवहाराशी संबंधित व्यक्तींवर राहील, असे नमूद केले आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी धज यांनी केली आहे. या निवेदनावर कुमार गायकवाड, प्रमोद कांबळे, अनिल वाघमारे यांच्या सह्या आहेत.